| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील लिलॅक हॉटेलच्या स्वयंपाक गृहात गुरुवारी (दि.22) सायंकाळी अचानक आग लागली. आगीचा भडका वाढला होता. हॉटेलमधील कामगारांनी सतर्कता दाखवत उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्रासह पाण्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली. अलिबाग नगरपरिषदेच्या अग्निशमन दलानेदेखील घटनास्थळी जाऊन आगीला नियंत्रणात आणले. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. मात्र, तेथील काही भाग जळून गेला. ही आग विजेचा स्पार्क झाल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज तेथील व्यवस्थापनाने व्यक्त केला. सुदैवाने जिवीतहानी टळली.
अलिबागमधील लिलॅक हॉटेलमधील कामकाज दुपारनंतर आटोपले होते. सर्व कामगार त्यांच्या अन्य कामात व्यस्त होते. अचानक स्वयंपाकगृहाच्या परिसरात धुर येऊ लागला. ही बाब कामगारांच्या लक्षात आल्यावर कामगारांनी क्षणाचाही विचार न करता,आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका वाढला होता. हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या एसटी आगारापासून काही अंतरावरून आगीचा भडका दिसून येत होता. अखेर कामगारांनी हॉटेलमध्ये असलेल्या उपलब्ध अग्निशमन यंत्रणाच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती अलिबाग नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, स्वयंपाक गृहातील पीओपीचा काही भाग जळाला. परंतु, कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचे तेथील व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.







