कार्यालयीन वेळेत खुर्च्या रिकाम्या; हालचाल रजिस्टर नसल्याचा धक्कादायक प्रकार
| पेण | प्रतिनिधी |
सरकारने पाच दिवसांचा आठवडा लागू करूनही पेणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या वेळेवर उपस्थितीचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.
पेण येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ‘कृषीवल’च्या प्रतिनिधीने सकाळी सव्वादहा वाजता पाहणी केली असता, सागर घाटकर आणि सुरेश सोनावणे हे दोघेच कर्मचारी उपस्थित होते. सागर मेणे, समीर म्हात्रे आणि प्राजक्ता मुकदुक हे गैरहजर होते. विशेष म्हणजे, कार्यालयात हालचाल रजिस्टर ठेवले जात नसल्याचे देखाल कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत उपअभियंता एस.एस. पाटोले यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नाही. त्यानंतर शेजारी असणाऱ्या कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात गेले असता तेथील रजिस्टरवर 14 कर्मचाऱ्यांची नोंद असतानाही महेश पाटील आणि अमोल भेकरे हे दोघेच उपस्थित होते. तर, पेण शाखेत अनिरुद्ध पाटील हे एकमेव कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड यांना संपर्क केला असता, त्यांना संपर्क होऊ शकला नाही. उपकार्यकारी अभियंता व्ही.एस. शिगवण यांच्याशी संपर्क झाला असता, त्यांनी 1 मिनीटात माहिती देण्याचे आश्वासन दिले; मात्र, अर्धा तास प्रतीक्षा करूनही त्यांच्याकडून काहीच माहिती दिली गेली नाही. पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधल्यावर गैरहजर कर्मचाऱ्यांची अर्ध्या दिवसाची रजा कापणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे दोन महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांत कर्मचारी गैरहजर आणि उपस्थितीच्या नोंदींबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच, सरकारी कार्यालयांतील या अनागोंदीला आळा घालण्याची मागणी होत आहे. या दोन्ही कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारीही गैरहजर असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना व आपल्या स्वतःवर कशा प्रकारे कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.







