। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमध्ये मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आयफोनच्या ईएमआयचे (हप्ते) पैसे भरण्यावरून झालेल्या वादातून 12 वर्षांपासूनच्या जिवलग मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक आंबवले रा. कोपरी गाव असे मृत तरुणाचे नाव असून, प्रतीक जाधव रा.उसर्ली असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रतीक आंबवले याने आयफोन खरेदी केला होता. मात्र, मोबाईलचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्याने आपला मित्र प्रतीक जाधव याचा मोबाईल क्रमांक आणि नाव दिले होते. काही काळानंतर हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून प्रतीक जाधव याला वारंवार फोन करून पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. याच कारणावरून दोघांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पनवेलमधील शिवकर गावात एका शाळेमागे दोघेही दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी आयफोनच्या हप्त्यांवरून पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात प्रतीक जाधव याने प्रतीक आंबवले याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी कोपरी पोलिसांनी तपास सुरू केला असता संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपी प्रतीक जाधव याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पनवेल गुन्हे शाखा एसीपी मयुर भुजबळ यांनी दिली आहे.






