| उरण | प्रतिनिधी |
मागील 20 महिन्यांत उरण परिसरात 6 हजार 443 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 3 हजार कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या. त्यात काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या आकडेवारीवरून कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत महिन्याकाठी सरासरी 300 श्वान दंशाच्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तरी उरण शहरातील व ग्रामीण भागातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






