उरण मधील कलावंत शासकीय मानधनापासून वंचित


। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोककला कलांची परंपरा कायम राखून ठेवणार्‍या कलावंत व त्याचबरोबर यातील काही दिवंगत कलावंतांच्या पत्नींना या कलेच्या योगदानाबद्दल शासकिय मानधन दिले जाते. परंतू गेले तीन-चार महिने उलटून देखील उरण तालुक्यातील लाभार्थी कलाकारांना मिळणारे मानधन न मिळाल्यामुळे कलावंत मंडळीला फारमोठी ओढाताण करावी लागत आहे. त्यामुळे या सर्व कलावंत मंडळीकडून संबंधित खात्याविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.
या विषयीची तक्रार शाहिर कै. पांडुरंग अंबाजी म्हात्रे यांच्या पत्नी श्रीमती हिराबाई पांडुरंग म्हात्रे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या वृत्तपत्रातून केली आहे. हिराबाई म्हात्रे यांच्यासह शेकडो लाभार्थी कलावंत या मिळणार्‍या कला मानधनापासून तीन-चार महिने वंचित आहेत. शेतकरी असलेल्या या कलामंडळीचे शेतीचे उत्पादन फार कमी प्रमाणात असल्यामुळे, या शेतकरी कलाकरांना सध्या औषध पाण्यासाठी व इतर काही समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित खात्याने या कलावंत मंडळींचा जास्त अंत न बघता याकडे लक्ष देऊन, त्यांना मिळत असलेले कलामानधन त्यांच्या बँक खात्यावर लवकरात-लवकर जमा करावे अशी मागणी कलावंत लाभार्थींमधून जोर धरु लागली आहे.

Exit mobile version