100 हेक्टर जागेवर आखणी सुरू
| पनवेल | प्रतिनिधी |
परदेशातील नामांकित विद्यापीठांचे कॅम्पस एकाच ठिकाणी उभारण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘एज्युसीटी’ प्रकल्पाला गती मिळाली आहे. करंजाडे येथील 100 हेक्टर जागेवर या प्रकल्पाची आखणी सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठा बदल अपेक्षित आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘एज्युसिटी’साठी सिडको मंडळाने करंजाडे येथील जमीन निश्चित केली आहे. यापूर्वी कुंडेवहाळ गावाजवळील जागेवर हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते. मात्र, करंजाडे येथील जमीन सपाट आणि विकासास अनुकूल असल्याने येथे पायाभूत सुविधा उभारणे सोपे जाईल, या कारणास्तव अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली. हा प्रकल्प सुमारे 100 हेक्टर क्षेत्रात उभारला जाणार असून त्यात परदेशातील 10 नामांकित विद्यापीठांना शिक्षण सेवा देण्याची संधी मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर हा प्रकल्प पुढील 3 वर्षांत उभारला जात आहे. त्यामुळे करंजाडे आणि पुष्पकनोड परिसराचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या भागासह नवी मुंबईलाच ‘शैक्षणिक शहर’ अशी ओळख मिळण्याची शक्यता आहे.
सिडकोने मागील वर्षी मुंबईत झालेल्या भव्य कार्यक्रमात ॲबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इन्स्टिट्यूटो युरोपिओ दी डिझाईन या पाच विद्यापीठांना इरादापत्रे दिली आहेत. प्रत्येक विद्यापीठाला सुमारे 10 एकर जागा देण्यात येणार असून सिडकोकडून रस्ते व इतर पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. भविष्यात देशातील मोठे गुंतवणूकदार या प्रकल्पात सहभागी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याच्या परिसरात महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यावर राज्य सरकारचा भर आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना एज्युसिटी, मेडिसिटी व इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी जागा मोकळी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आहेत. यासाठी दररोज सिडकोचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा सुरू आहेत.






