कर्जतकरांच्या उपोषणाला तूर्तास स्थगिती
। कर्जत । प्रतिनिधी ।
गेली अनेक दिवस कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रोज त्याच त्याच समस्यांमुळे कर्जत शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी आणि निवेदन देऊन देखील समस्या सुटत नसल्याने कर्जत शहर बचाव समितीने कर्जत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवार दि.16 डिसेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली होती. अखेर शनिवारी (दि.21) सहाव्या दिवशी कर्जत नगरपरिषदेने विविध नागरी समस्या सोडविण्याबाबतचे आश्वासन आणि लेखी पत्र दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.
कर्जत बचाव समितीने पुकारलेल्या आमरण साखळी उपोषणाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळाल्यामुळे कर्जत शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, उपोषणाच्या दुसर्या दिवशी कर्जत नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि परिवहन वाहतूक अधिकारी यांची समितीसोबत चर्चा झाली होती. परंतु, जो पर्यंत नागरी समस्यांबाबत पालिकेकडून ठोस उपाय योजना आणि प्रत्यक्ष कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषण सुटणार नाही, असे समितीकडून सांगण्यात आले होते. समिती उपोषणावर ठाम राहिल्याने उपोषणाच्या चौथ्या दिवशी उशीरा कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी भेट देऊन काही समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात केली. तसेच, उपोषणाच्या पाचव्या दिवशी नागरी समस्यांबाबत प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्याने समितीने समाधान व्यक्त केले आहे. परंतु, असे असले तरी काही समस्या सोडविण्याबाबत पालिका अधिकार्यांनी मुदत मागितल्याने तूर्तास हे उपोषण स्थगित केल्याचे अॅड. कैलास मोरे यांनी जाहीर केले आहे.
मागण्यांची पूर्तता..
एक्सप्रेस फिडर 6 महिन्यांत कार्यान्वित करणार, पाणी गळतीचे काम 45 दिवसांत पूर्ण करणार, पाणीपुरवठा वाहिनींतून पाणी चोरी कनेक्शनबाबत शहानिशा करणार, कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणार, घंटा गाड्यांना तात्काळ घंटा बसविणार, शौचालयांची दुरुस्ती करून घेणार, रस्ता रहदारीतील विद्युत पोल हटविणार, महत्वाच्या ठिकाणी ननवीन सीसीटीव्ही बसविणार, अनधिकृत हातगाड्या हटविणार, तसेच, अधिकृत हातगाड्यांवर नंबर प्लेट लावणे तसेच हातगाड्यांची पर्यायी व्यवस्था करून हातगाड्यांना पिवळ्या पट्ट्याच्या आंतमध्ये लावण्याचे निर्देश देणार, आरोग्य फवारणी संदर्भात आठवड्याचे वेळापत्रक देणार, एकरी वाहतूक चालू करून अनधिकृत रिक्षा स्टँडवर कारवाई करून बॅरिगेट्स कायमस्वरूपी करणार असल्यच्या मागण्या पुर्ण करण्याचे आरूवासन देण्यात आले आहे.