वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल येथील कळंबोली सर्कल येथे उड्डाणपुलाच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्ग, जेएनपीटी मार्ग आणि शहरांतर्गत वाहतुकीचा संगम असलेल्या या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ होत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे 30 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेगाने सुरू आहे.
प्रकल्पाअंतर्गत एकूण 8 आर्म (मार्ग) आणि 2 अंडरपास उभारण्यात येणार आहेत. शिळफाटा ते स्टील यार्ड, पुणे ते शिळफाटा, पुणे ते मुंबई, पनवेल ते मुंबई, मुंबई ते पनवेल, मुंबई ते जेएनपीटी, जेएनपीटी ते पुणे आणि शिळफाटा ते पुणे अशा विविध दिशांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच पनवेल ते शिळफाटा, पनवेल ते स्टील यार्ड या दोन अंडरपासमुळे स्थानिक वाहतुकीलाही मोठी मदत होणार आहे. या उड्डाणपुलामुळे कळंबोली सर्कलवरील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहनचालकांचा वेळ व इंधनाची बचत होणार आहे. या प्रकल्पाचे 30 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेगाने सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे, जेएनपीटी व पनवेल दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कळंबोली सर्कलवरील दीर्घकालीन वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 7 उड्डाणपूल, 2 उपसरणी (अंडरपास) आणि 45 जोडमार्ग उभारण्यात येणार आहेत. काही उड्डाणपुलांसाठी पाया, पाइलिंग आणि गर्डर बसविण्याची कामे सुरू झाली आहेत. तसेच सेवा रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन वळणमार्गांची उभारणी आणि बांधकाम क्षेत्राभोवती सुरक्षात्मक बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
कळंबोली सर्कलवरील बहुस्तरीय प्रकल्प हा वाहतूक कोंडीच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय आहे. काम नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष दक्षता घेत आहोत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा प्रवाह सिग्नल-विरहित व अधिक सुरळीत होईल. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. 2027 अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
-ऋषिकेश कोरडे
प्रकल्पाचे व्यवस्थापकीय प्रमुख







