कशेळे ग्रामीण रुग्णालयासमोर बगीचा बनविण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या दुरुस्तीदरम्यान रुग्णालयाच्या दर्शनी भागातील जुनी इमारत पाडून ती जागा मोकळी करण्यात आली आहे. या विस्तीर्ण जागेवर काँक्रिटीकरण केले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी काँक्रिटीकरण रद्द करून रुग्णांच्या आणि ग्रामस्थांच्या सुविधेसाठी सुंदर बगीचा बनवावा, अशी मागणी केली आहे.
कशेळे ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील बाजूस असलेली जुनी इमारत हटवल्यानंतर तिथे मोठी मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. या जागेचा वापर परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि पर्यावरणपूरक कामासाठी करणे अपेक्षित होते. मात्र, सध्या तिथे सिमेंटचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आधीच उन्हाचा पारा चाळीशी पार गेला असून, सर्वसामान्य जनता कमालीच्या उष्णतेने त्रस्त आहे. अशा परिस्थितीत शहरांपासून गावांपर्यंत होणाऱ्या अमर्याद काँक्रिटीकरणामुळे जमिनीची उष्णता अधिकच वाढत असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे, याकडे स्थानिक जागरूक ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे.
कशेळे ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात काँक्रिटीकरणामुळे उष्णता अधिक वाढणार आहे. त्याऐवजी जर इथे वृक्षारोपण करून सुंदर बगीचा विकसित केला, तर रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्यासोबत असणारे नातेवाईक यांना झाडांच्या सावलीत, शांत वातावरणात बसता येईल. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने रुग्णांनाही मानसिक दिलासा मिळेल. त्यामुळे प्रशासनाने जिथे जिथे शक्य आहे, तिथे काँक्रिटीकरण टाळून झाडे लावायला हवीत, अशी मागणी स्थानिक नागरिक राजेंद्र हरपुडे यांनी केली आहे.
दरम्यान, रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला येण्या-जाण्यासाठी आणि पार्किंगसाठी आवश्यक तेवढ्याच मर्यादित जागेत काँक्रिटीकरण करावे. उर्वरित संपूर्ण विस्तीर्ण जागेत माती टाकून लॉन, फुलझाडे व सावली देणारी मोठी झाडे लावून प्रशासनाने स्वतः एक आदर्श निर्माण करावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे कशेळे ग्रामीण रुग्णालयातील काँक्रिटीकरणाचे काम तात्काळ थांबवून तिथे तात्काळ बगीचा उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे.
सध्या शासकीय पातळीवर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश मोठ्या प्रमाणावर दिला जातो. या रुग्णालयाच्या आवारात झाडे लावल्यास रुग्णालयाच्या सौंदर्यात भर पडेल आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल.






