अनेक योजना निधीअभावी पडल्या धूळखात
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील जनतेला भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासन स्तरावरुन रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती उरण यांच्या देखरेखीखाली जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांमध्ये, आदिवासी वाडीवर योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, उरण तालुक्यातील जवळ-जवळ 15 ग्रामपंचायत हद्दीतील योजना या निधीअभावी धूळखात पडल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे. त्यामुळे तालुक्यात ‘जलजीवन’ची घागर उताणी पडली, अशी चर्चा जनमानसात आहे.
देशात उद्भवणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 15 ऑगस्ट 2019 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत शासन स्तरावरुन घेतला. मात्र, प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे सदरच्या योजना या तकलादू ठरल्या आहेत.
उरण तालुक्यातील जवळ जवळ 15 ग्रामपंचायत हद्दीतील योजना या निधीअभावी धूळखात पडल्याचे भयानक वास्तव समोर येत असून, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांवर टंचाईच्या झळा सहन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषद तथा पंचायत समिती उरण पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.







