| बोर्लीपंचतन | मकरंद जाधव |
श्रीवर्धन तालुक्यात नागरी वस्त्या आणि ग्रामीण भागात माकडांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांसह बागायतदार त्रस्त झाले आहेत. नागरी वस्तीत घरात घुसून वस्तूंची नासधूस करणे खाद्यपदार्थ पळविणे, तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी यांसारख्या फळपिकांचे नुकसान करण्याचे प्रकार वाढले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून वन विभागाने माकड पकड मोहीम हाती घेतली असून, श्रीवर्धन तालुक्यातील कापोली येथे आतापर्यंत 85 माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे.
ही मोहीम ग्रामपंचायतींकडून वन विभागाकडे लेखी मागणी करण्यात आलेल्या गावांच्या हद्दीत प्राधान्याने राबविण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर येथील रेस्क्यू टीमच्या सहकार्याने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून ही मोहीम सुरू आहे. उप वनसंरक्षक शैलेंद्र कुमार जाधव व सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या निर्देशानुसार श्रीवर्धन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील चंबुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये वनपाल दीपक शिंदे, वनरक्षक तेजेस ढेपे, स्वप्नील रासकर, विलास नन्नवरे, हनुमान कोरडे, आकाश पोळ, रेस्क्यू टीमचे समाधान गिरी, संदीप गिरी, कृष्णा गिरी आणि वाहनचालक शैलेश केळसकर यांनी सहभाग घेतला. कापोली येथे 85 माकडे पकडण्यात आल्याने नागरिक आणि बागायतदारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तालुक्यातील माकडांचा उपद्रव असलेल्या अन्य गावांमध्येही ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार ही मोहीम राबविण्यात येणार आहे.






