11 देशांतील अधिकाऱ्यांनी घेतली माहिती
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील गोवे येथील हान्स ॲक्वाकल्चर फार्ममध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देणे, मत्स्यपालन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जागतिक स्तरावर पोहोचवणे आणि शाश्वत मत्स्यव्यवसायाचे मॉडेल विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 11 देशांतील सरकारी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील मत्स्यपालन क्षेत्राला जागतिक स्तरावर ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चअंतर्गत कार्यरत असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी दिल्लीतील आफ्रिकन-एशियन रुरल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण मत्स्यउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्य व्यवसाय मॉडेल या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा हा एक महत्त्वपूर्ण भाग होता. या प्रशिक्षण दौऱ्यात बांगलादेश, इजिप्त, गाम्बिया, जॉर्डन, केनिया, इस्वाटिनी, मॉरिशस, मोरोक्को, श्रीलंका, ट्युनिशिया आणि झांबिया या 11 देशांतील सरकारी अधिकारी सहभागी झाले होते. या प्रतिनिधींना हान्स ॲक्वाकल्चर फार्ममध्ये राबविण्यात येणाऱ्या मत्स्यपालनाच्या विविध पद्धती, फार्मचे व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया आणि आधुनिक मत्स्यव्यवसायाचे स्वरूप यांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान प्रात्यक्षिके, तज्ज्ञांशी संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि विविध विषयांवरील चर्चांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकात्मिक मत्स्यपालन पद्धती, मत्स्यपालन व्यवसायाचे नियोजन, फार्मचे दैनंदिन कामकाज तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत मत्स्यपालन व्यवसाय मॉडेल यांची सविस्तर माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली.






