थकीत ई-चलनाच्या दंडावर 20 टक्के सवलत; 1 डिसेंबरपासून वर्षभर योजना लागू
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ई-चलनाचा दंड थकविणाऱ्या वाहनचालकांना आता दिलासा मिळणार आहे. थकीत ई-चलनाच्या तडजोड रकमेत 20 टक्के सवलत देण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना’ लागू केली आहे. 1 डिसेंबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2027 या वर्षभराच्या कालावधीत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, ही संधी संपल्यानंतरही वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहन जप्ती आणि परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा वाहतूक शाखेने दिला आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईतून अपेक्षित दंडवसुली होत नसल्याने मोठ्या प्रमाणात थकीत चलनांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत थकीत ई-चलनाच्या तडजोड रकमेत 20 टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत तीन टप्प्यांत लागू होणार असून, 21 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीतील प्रलंबित चलनांसाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 1 डिसेंबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2027 या कालावधीत आकारण्यात आलेल्या चलनांचा दंड 45 दिवसांच्या आत भरावा लागणार आहे. तर 30 जानेवारी 2019 ते 20 जानेवारी 2026 दरम्यानची न्यायालयात प्रलंबित असलेली चलने 30 दिवसांच्या मुदतीत भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
रायगड जिल्हा पर्यटन आणि औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने येथे पर्यटकांसह नोकरी-व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. दुचाकींसह विविध वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अनेक वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. अशा चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून ई-चलनाद्वारे कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 15 हजारांहून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, लाखो रुपयांचा दंड प्रलंबित असल्याची माहिती आहे. आता अभय योजनेमुळे थकीत दंड भरण्याची संधी मिळणार आहे. मात्र, सवलतीचा लाभ न घेता नियमभंग सुरूच ठेवणाऱ्या चालकांवर पुढील काळात कठोर कारवाई होणार आहे.






