ओळख पुसण्यासाठी चेहऱ्यावर ॲसिड; गावाजवळील माळरानावर मृतदेह फेकला
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेवाळी येथे 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह गावाजवळील माळरानावर फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.29) उघडकीस आली. रोहित संजय ढोले असे मृत तरुणाचे नाव असून, हत्येनंतर त्याची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याची माहिती समोर आली आहे. शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा आढळल्याने या हत्येचे गांभीर्य वाढले असून, परिसरात खळबळ उडाली आहे रोहित यांची पत्नी कर्जत नगरपरिषदेत सफाई कर्मचारी असल्याने ते कामानिमित्त कर्जत शहरात राहात होते. गावातील हळदी समारंभासाठी ते नेवाळी येथे आले होते. मात्र, रात्री समारंभातून ते अचानक निघून गेले. त्यानंतर ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला.
सकाळी मोबाईल लोकेशनच्या आधारे आवळस गावाजवळील माळरानावर शोध घेतला असता रोहित यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हत्येनंतर चेहऱ्यावर ॲसिड टाकून ओळख पुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील आणि सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत आहेत. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान कर्जत पोलिसांसमोर आहे.






