| खरोशी | प्रतिनिधी |
शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वडखळ नाका येथील महर्षी क्लिनिकतर्फे 28 नोव्हेंबर रोजी परिसरातील रायगड जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुवर्णप्राशन डोस उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महर्षी क्लिनिकचे डॉ. शुभम म्हात्रे आणि डॉ. मानसी पाटील-म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कोळवे शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र म्हात्रे यांच्या पुढाकाराने व सहकार्याने वडखळ, कोळवे, बोरी आणि मसदबेडे येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत सुवर्णप्राशन डोस देण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी पालक आणि शिक्षकांना सुवर्णप्राशन संस्कार तसेच बदलत्या हवामानात मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला वडखळच्या सरपंच शिवानी विश्वास म्हात्रे, उपसरपंच रविंद्र म्हात्रे आणि पत्रकार विजय मोकल उपस्थित होते. मान्यवरांनी महर्षी क्लिनिक आणि मुख्याध्यापक जितेंद्र म्हात्रे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. महर्षी क्लिनिकमध्ये दर महिन्याला सुवर्णप्राशन संस्कारासह जनरल फिजिशियन, सर्जन सेवा, बालरोग निदान व अन्य आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी चारही शाळांचे शिक्षक आणि क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.






