युथ क्लब महाडचा स्तुत्य उपक्रम
| महाड | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडाला 13 डिसेंबर रोजी 15 किलोमीटरची प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. युथ क्लब महाड आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद प्रस्तुत राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणेचे हे 35 वे वर्ष आहे. या उपक्रमात शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रविवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून प्रदक्षिणेला सुरुवात होणार आहे. सुमारे 15 किलोमीटरचे अंतर सहभागी व्यक्तींना पायी पूर्ण करावे लागणार आहे. गेल्या 35 वर्षांपासून युथ क्लब महाडच्या माध्यमातून या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. रायगड प्रदक्षिणा ही केवळ पदयात्रा नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची आणि ऐतिहासिक वारशाशी नाते जोडण्याची संधी आहे. या प्रदक्षिणेत 10 वर्षांवरील सशक्त व्यक्तींना सहभागी होता येणार असून, प्रत्येकासाठी 400 रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्यांनी पाण्याची बाटली, टोपी, बूट किंवा स्पोर्ट्स शूज, सुती कपडे, टी-शर्ट अथवा सलवार-कमीज आणि आवश्यक औषधे सोबत ठेवावीत. मुक्काम करणाऱ्यांनी अंथरूण-पांघरूण आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रदक्षिण्ोसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, इच्छुकांनी www.youthclubmahad.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या उपक्रमात शिवभक्त, इतिहासप्रेमी, गिर्यारोहक आणि युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद आणि युथ क्लब महाडच्या संयोजन समितीने केले आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला युथ क्लबचे अध्यक्ष राजेश बुटाला, उपाध्यक्ष संजय माळवदे, अशोक तलाठी, दिलीप धारप, दिवा धारप, चंद्रकांत देशमुख, मकरंद जोशी, डॉ. दाभाडकर, संतोष सकपाळ, राजेंद्र सासण्ो आदी उपस्थित होते.






