| गडब | प्रतिनिधी |
पोलीस अधीक्षक आँचल दलाल व अप्पर पोलीस अधीक्षक शिवतेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांच्या अंतर्गत पाबळ बिट चौकी, मौजे आमटेम येथे नव्या पोलीस चौकीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी योगिता कुंटे, वडखळचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले, दादर सागरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता सांगळे, पोलीस उपनिरीक्षक भाग्यवान कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश ठाकूर, दिनेश ढेणे, धर्मेंद्र वर्तक, योगिता पाटील, राम ठाकूर, आकाश कुथे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यांच्यासह आमटेम, निगडे, पाबळ, पांडापूर या सर्व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाबळ बिट चौकी अंतर्गत एकूण 27 गावे येतात. या 27 गावांमध्ये तात्काळ व अर्जंट मदत पोहोचावी, हा या चौकीचा प्रथम उद्देश आहे. पूर्वी या गावातील नागरिकांना तक्रार करण्यासाठी वडखळ पोलीस ठाण्यात जावे लागत होते. त्यामुळे मदत मिळण्यास उशीर होत होता. आता मात्र या चौकीमुळे नागरिकांना जवळच पोलीस मदत मिळणार आहे. तसेच या भागात होणाऱ्या घरफोडी, चोरी यांसारख्या घटनांना या चौकीमुळे मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पोलीस गस्त वाढल्याने गुन्हेगारांवर वचक राहणार आहे.






