मोटारसायकलसह दोन वाहनांचे नुकसान; दोघे जखमी
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर शहरातील महाबळेश्वर रस्त्यावर पोलादपूरहून महाडकडे निघालेल्या भरधाव कारच्या ड्रायव्हरला डुलकी लागल्याने अपघात घडला. या अपघातात एका मोटारसायकलसह दोन वाहनांचे नुकसान झाले असून एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
पोलादपूर शहरातील महाबळेश्वर रस्त्यावर जनसेवा शाळेसमोर दुतर्फा वाहने उभी ठेऊन अनेकजण बाजारपेठेत खरेदीसाठी जातात. गणेशोत्सव काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलादपूर पोलिसांनी या भागात गणेशोत्सवापूर्वी वाहने पार्किंग करण्यास विरोध करीत हा रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांना या रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करण्याची सवय असल्यामुळे पोलिसांची पाठ फिरताच काही तासांतच वाहने उभी करण्यास सुरुवात झाली.
पोलादपूर बाजारपेठेत एकेरी वाहतूक करून गाडीतळाजवळील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहासमोरील आणि भैरवनाथनगर रस्त्यावर एक्झीट ठेऊन वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्नदेखील विविध प्रकारच्या व्यापारी वर्गाने दुकानात भरलेल्या मालाला गिऱ्हाईक मिळण्यास तसेच ऐन गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहकांना अडचणीचा असल्याचे सांगत पूर्ववत् दुहेरी करण्यात आला. यामुळे पोलादपूर शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्याचे प्रयत्न रहित झाले आहेत.
पोलादपूर-महाबळेश्वर रोडवर शनिवारी (दि.19) सकाळी अंदाजे पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रँड विटारा कार (क्र. एमएच 11 डीझेड 4046) वरील ड्रायव्हर आदेश रवींद्र गवते (वय 31, रा. ओझर्डे, ता. वाई, जि.सातारा) हा महाबळेश्वर बाजूकडून महाडकडे जात होता. त्याला अचानक डुलकी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी उजव्या बाजूला रॉंग साईडला जाऊन अपघात झाला. या अपघातात रस्त्याच्या बाजूला पार्क असलेल्या इको कार (क्र. एमएच 06 सीएल 0802) व छोटा हाथी (क्र.एमएच 06 सीपी 4094) तसेच समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच 06 सीएफ 2929) ठोकर दिली. यात मोटारसायकलस्वार विजय शिंदे (वय 55 वर्ष, रा. नवीन वसाहत चोळई, ता. पोलादपूर) हे किरकोळ जखमी झाले तर पादचारी फिरोज रफिक शेख (वय 40 वर्षे, शिवाजीनगर मोहल्ला, ता. पोलादपूर)यादेखील किरकोळ जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमींना उपचारांसाठी पोलादपूर शहरातील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच अपघातातील वाहने महाबळेश्वर रस्त्याबाहेर बाजूला उभी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.





