गावाचा बाह्य जगाशी संपर्क तुटला; शासकीय व्यवहारही खोळंबले
| महाड | सुजित धाडवे |
देश डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना महाड आणि मंडणगड तालुक्याच्या सीमेवर, सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलाने वेढलेल्या कुडूक गावात आजही एका मोबाईल सिग्नलसाठी जीव टांगणीला लागला आहे. सुमारे तीनशे ते चारशे लोकवस्ती असलेल्या या कुडूक खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील भारत संचार निगम लिमिटेडचा (बीएसएनएल) टॉवर डौलात उभा असला तरीही ग्रामस्थ अद्यापही नेटवर्कच्या प्रतीक्षेत आहेत. मोबाईलच्या स्क्रीनवर दिवस-रात्र फक्त ‘नो सर्व्हिस’ दिसत असून संपूर्ण गावाचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे.
हा बोजवारा केवळ मोबाईल टॉवरपुरता नाही. याच भागातील लॅन्डलाईन आणि ब्रॉडबँड सेवाही अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. सेवा बंद असतानाही दरमहा बील भरावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. याबाबत मंडणगड कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तोंडी आणि लेखी तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे. ग्रामस्थांनी या संदर्भात लेखी निवेदने दिली असून त्यावर कार्यालयाचा प्राप्त शिक्का देखील आहे, तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तांत्रिक बिघाड आणि देखभालअभावी हा एकमेव टॉवर ठप्प झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी बीएसएनएल कार्यालयासह तहसील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, मात्र आश्वासनांपलीकडे ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे सदर वाडी दरडग्रस्त म्हणून जाहीर असून, तहसिलदार कार्यालयाकडून घरांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अशा संवेदनशील ठिकाणी संपर्क यंत्रणाच बंद असणे अधिक धोकादायक ठरत आहे.
या ठप्प नेटवर्कचा थेट फटका दैनंदिन जीवन, शिक्षण आणि रोजगारावर बसला आहे. अनेक कुटुंबांनी स्वखर्चाने घरात वाय-फाय बसवले असले तरी मुख्य नेटवर्कच नसल्याने ती यंत्रणा कुचकामी ठरली आहे. सध्या आठवड्यातून केवळ एक-दोन वेळा काही तासांपुरते नेटवर्क डोकावते आणि पुन्हा गायब होते. शहरातून सुट्टीसाठी गावी आलेल्या तरुणांचे वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग, ई-मेल, बँक व्यवहारांचे ओटीपी ठप्प झाले आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज, शिष्यवृत्तीचे फॉर्म आणि शेतकऱ्यांचे सात-बारा, पीकविमा यासारखे शासकीय व्यवहारही खोळंबले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जुन्या टॉवरची दुरुस्ती करण्यासोबतच अधिक क्षमतेचा नवीन टॉवर उभारून ‘नो रेंज’चा प्रश्न कायमचा मिटवावा आणि बंद असलेल्या सेवा तात्काळ सुरू करून बंद कालावधीचे बील माफ करावे, अशी एकमुखी मागणी जोर धरू लागली आहे.
डोंगरावर वसलेल्या आमच्या कुडूक गावात अजिबात नेटवर्क मिळत नाही. वाय-फाय बसवूनही उपयोग होत नाही. नेटवर्क आठवड्यातून एक-दोनदाच येते. आणीबाणीच्या वेळी संपर्कच होत नाही. शासनाने तातडीने नवीन टॉवर उभारावा.
संदेश पवार,
ग्रामस्थ, कुडूक






