साजगाव येथे तात्काळ स्वच्छता अभियान
| पाताळगंगा | वार्ताहर |
संपूर्ण महाराष्ट्रात धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असणारी साजगाव येथील बोंबल्या विठोबाची यात्रेची काही दिवसांपूर्वी सांगता झाली आहे. परंतु, यात्रेनंतर अस्ताव्यस्त पडलेल्या कचर्यामुळे येथील परिसर बकाल झाला होता. कचर्यामुळे दुर्गंधी पसरली होती. याविरोधात कृषीवलने आवाज उठवत ‘यात्रा संपली, उरला फक्त कचरा’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच खोपोली नगरपरिषद प्रशासनाला जाग आली. पालिका आरोग्य विभागाच्या टीमने येथील परिसराची स्वच्छता केली.
साजगाव यात्रा संपली आणि व्यापारी कचरा येथेच टाकून परतीच्या प्रवासाला निघून गेले. याबाबत खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार व कृषीवलच्या बातमीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाहीला सुरुवात केली. पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी टीम साजगाव यात्रेच्या पटांगणात पाठवून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली असून, जंतुनाशक फवारणीही करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
साठलेल्या कचर्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे या समस्येची दखल घेत आरोग्य विभागाला आदेश देऊन जत्रेचा परिसर स्वच्छता करण्याची मोहीम केली आहे. तसेच कचरा लवकरात लवकर साफ करावा अशी सूचना केली आहे.
अनुप दुरे
मुख्याधिकारी