। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्ह्यात 18 ते 19 तसेच 85 वर्षापुढील असे एकूण 87 हजार 471 मतदार आहेत. या निवडणुकीत नव मतदारांसह ज्येष्ठ मतदारांचे मतं निर्णायक ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, महाड, श्रीवर्धन, कर्जत या सात विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी 111 उमेदवारांनी 140 उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी (दि.30) दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या छाननीमध्ये सर्वच अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. अर्ज मागे घेण्याची प्रक्रीया 4 नोव्हेंबर रोजी असणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन हजार 790 केंद्रामध्ये मतदान प्रक्रीया पार पाडणार आहे. सातही विधानसभा मतदार संघात 24 लाख 68 हजार 120 मतदार आहेत. त्यामध्ये युवा, महिला व 85 वर्षावरील मतदारांची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. जिल्हयामध्ये 18 ते 19 वयोगटातील 51 हजार 612 तसेच 85 वर्षापूढील 35 हजार 859 मतदार आहेत. हे मतदार निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे कोणाला युवा पिढीसह ज्येष्ठ नागरिकांचे कौल मिळणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा मतदारावर दृष्टीक्षेप
| मतदार संघ | 18 ते 19 वयोगट | 85 वर्षावरील मतदार |
| पनवेल | 14850 | 3936 |
| कर्जत | 7260 | 6541 |
| उरण | 7692 | 3565 |
| पेण | 6410 | 4398 |
| अलिबाग | 6042 | 6676 |
| श्रीवर्धन | 3935 | 2847 |
| महाड | 5383 | 6896 |
| एकूण | 51612 | 35859 |







