आदिवासीवाड्यांवर विशेष शिबिरे
| पेण | प्रतिनिधी |
शासनाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण 2026 कार्यक्रमांतर्गत पेण विधानसभा मतदारसंघात मतदारनोंदणी व पडताळणीचे काम वेगाने सुरू असून, एकही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
पेण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत रोडे, बूथ क्रमांक 168 अंतर्गत फणसवाडी आदिवासीवाडी येथे विशेष एसआयआर मॅपिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आदिवासी मतदारांचे फॉर्म भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच मतदारांना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याउपक्रमात बीएलओ अधिकारी, त्यांचे सहकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षकवृंद आणि आशा सेविका यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामपंचायत रोडेचे सरपंच दिनेश पवार तसेच माजी सरपंच स्वप्नील म्हात्रे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी भविष्यात एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, शिबिरास अनुपस्थित राहिलेल्या आदिवासी कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, एसआयआर मॅपिंगचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे का, याची पाहणी करण्यासाठी पेणचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) प्रवीण पवार यांनी शिबिराला भेट दिली. त्यांच्यासोबत नायब तहसीलदार नितीन परदेशी व निवडणूक अधिकारी तुषार कामत यांनीही उपस्थित राहून बीएलओ अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. एसआयआर फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी पेण तालुक्यातील सर्व बीएलओ यांनी एसआयआर मॅपिंगचे 100 टक्के उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सर्व मतदारांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास किंवा बीएलओ स्तरावर समाधानकारक मदत मिळाली नाही, तर नागरिकांनी थेट पेण तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. शासनाच्या या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेमुळे पात्र मतदारांची नावे अचूक व अद्ययावत राहण्यास मदत होणार असून, दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे पोहोचविण्यास प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.







