| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या संघाने दमदार फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाचा 71 धावांनी पराभव करत 23 वर्षांखालील पुरुषांच्या 30 व्या बापुना चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामना नागपूर येथील व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर पार पडला.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात करत मुंबईचा हा निर्णय चुकीचा ठरवला. सागर पवारने अवघ्या 33 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 66 धावांची तुफानी खेळी केली. त्याला कृष्ण शहापूरकरने 29 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी अवघ्या चार षटकांत 64 धावांची सलामी दिली.
त्यानंतर कर्णधार सचिन धसने नाबाद 76 धावांची शानदार खेळी करत डावाला आकार दिला. त्याने 46 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकार ठोकले. अभिनव तिवारीने नाबाद 41 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 117 धावांची भागीदारी केली. त्यामुळे महाराष्ट्राने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 219 धावांचा डोंगर उभारला.
विजयासाठी 220 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांना महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवले. मुंबईचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 148 धावांवर गारद झाला. नमन झावरने 24, तर अर्जुन दानीने 27 धावा केल्या. महाराष्ट्राकडून श्रेयस चव्हाणने 28 धावांत 4 बळी घेतले, तर आयुष बिरादारने 28 धावांत 3 बळी मिळवले. परिणामी महाराष्ट्राने 71 धावांनी दणदणीत विजय मिळवत बापुना चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा तसेच महाराष्ट्राच्या संघाचा जलदगती गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे याने आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर विशेष छाप पाडली. त्याने स्पर्धेत 9 बळी मिळवत शुभम माईड याच्यासह उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकावला. मुंबईच्या नमन झावरने 151 धावा करत उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मिळवला, तर अंतिम सामन्यात 66 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या सागर पवारला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.







