| रसायनी | प्रतिनिधी |
माय भारत आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, खेलो इंडिया सेंटर अंतर्गत एमईएस पिल्लई एचओसीएल इंटरनॅशनल स्कूल येथे तीन दिवशीय नशा युवा मुक्ती कार्यक्रम आणि आंतरशालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडल्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्यक संचालक बिंदू प्रसाद, माय भारतचे उपसंचालक अनुप इंगोले आणि एचओसीएलचे कर्नल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण आणि क्रीडा मशाल प्रज्वलित करून या भव्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. नशा मुक्तीचा संदेश तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत हजारो खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये फुटबॉल, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, रायफल शूटिंग, टेबल टेनिस, रस्सीखेच, बास्केटबॉल, बुद्धिबळ आणि थ्रो बॉल या विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी युवा खेळाडूंना नशा मुक्तीचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पिल्लई एचओसीएल इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ. रीमा निकाळजे आणि मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह आर. बी. पाटील यांच्या हस्ते सर्व प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार करण्यात आला. या क्रीडा स्पर्धेचे मुख्य सचिव म्हणून इम्रान खान आणि त्यांच्या समवेत वरिष्ठ क्रीडा शिक्षक सचिन माळी, प्रतीक पाटील, सिद्धार्थ शिंदे यांनी व त्यांच्या टीमने उत्तम नियोजन केले.






