निसर्गरम्य परिसर कचराकुंडीत
| पनवेल | प्रतिनिधी |
निसर्गरम्य वातावरण आणि शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या खारघर टेकडी परिसराला मद्यपींचा विळखा पडला आहे. रात्रीच्यावेळी मद्यपान आणि पार्ट्यांसाठी येथे गर्दी होत असून, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांच्या प्लेट आणि अन्य कचरा परिसरातच टाकला जात आहे. टेकडीवरील सुमारे तीन किलोमीटरच्या पट्ट्यात कचऱ्याचे ढीग साचल्याने या परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची नाराजी निसर्गप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
युथ हॉस्टेल खारघरचे अध्यक्ष पंकज पंडित आणि त्यांचे सहकारी नियमितपणे टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि अन्य कचरा गोळा करतात. मात्र, रात्रीच्यावेळी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या व कचरा तिथेच टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने त्यांच्या श्रमांवर पाणी फिरत आहे. स्वच्छतेसाठी स्वयंसेवकांकडून प्रयत्न होत असतानाही दुसऱ्याच दिवशी पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
टेकडी परिसरात प्रवेश करताना सामान्य नागरिकांकडून मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्राची माहिती घेतली जाते. असे असताना रात्रीच्यावेळी मद्यपान करून कचरा करणाऱ्या व्यक्तींना प्रवेश कसा मिळतो, असा सवाल खारघर हिल्स वेल्फेअर असोसिएशनचे सुनील वाघ यांनी उपस्थित केला आहे. टेकडी परिसरातील प्रवेश नियंत्रण अधिक कडक करावे, रात्रीची गस्त वाढवावी आणि मद्यपान तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






