कोंढे आरोग्य उपकेंद्रात लसीकरण

। चिपळूण । वृत्तसंस्था ।

चिपळूण तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणार्‍या कोंढे उपकेंद्रात सोमवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. गावचे उपसरपंच हसन खान यांनी पहिली लस घेऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. पहिल्या दिवशी गावातील 45 वर्षांवरील 50 ग्रामस्थांनी पहिला डोस घेतला.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात व काही उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोंढेगाव खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून, येथील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

त्यामुळे कोंढे उपकेंद्रात लसीकरणास परवानगी मिळाली यासाठी ग्रामपंचायत, ग्रामकृती दलाचे पदाधिकारी व सदस्य गेले काही दिवस पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, सोमवारपासून कोंढे उपकेंद्रात लसीकरण सुरू झाले आहे. यानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. मयेकर,आरोग्य सेविका पवार यांच्यासह सहकार्‍यांचा सरपंच माधवी कुळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार ज्येष्ठ कार्यकर्ते भाई करंजकर यांनी केले.

Exit mobile version