रायझिंग स्टार कोंढे उपविजेता, सोहम शिंदे ठरला मालिकावीर
। चिपळूण । प्रतिनिधी ।
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 5 कोंढे व त्रिशरण युवक मंडळ यांच्या सौजन्याने आर्यन ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून कळवंडे येथे आयोजित केलेल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत शांतीरत्न भिले संघ विजेता तर रायझिंग स्टार कोंढे हा संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत उंच षटकारांसह तुफान फलंदाजी आणि आक्रमक गोलंदाजी करणारा रायझिंग स्टारचा खेळाडू सोहम शिंदे हा मालिकावीरचा मानकरी ठरला.
तीन दिवस आयोजित केलेल्या या स्पर्धेत 30 हून अधिक संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भावकीचे माजी खजिनदार, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मिलिंद कदम यांच्या हस्ते आ. निकम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संजय कदम, राजेंद्र कदम, गणेश साबळे, ग्रामपंचायत सदस्या करंजकर, भरत करंजकर आदी उपस्थित होते. स्पर्धेला पंचायत समिती सदस्य सुनिल तटकरे, ग्रामसेवक मंगेश पांचाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.
मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या भिले संघाला 10 हजार रूपये व चषक, उपविजेत्या कोंढे संघाला 7 हजार रूपये व चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच मालिकावीर सोहम शिंदे, उत्कृष्ट फलंदाज राजू, उत्कृष्ट गोलंदाज धीरज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुशांत कांबळे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.