| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल येथे रविवारी (दि. 19) ‘नगराध्यक्ष चषक’ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड आणि स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन समारंभाला वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, सभापती अनिल चोपडा, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलीस अधिकारी किशोर साळे, नगरसेविका अश्विनी ठोसर, नगरसेवक ॲड.ऋषिकेश माळी, नगरसेविका निवेदिता वाघमारे, नगरसेविका योजना पाटील, नगरसेवक जमाल सय्यद, नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेवक संदीप पालकर माजी नगरसेवक महेश शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी, मान्यवर, स्पर्धक, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री गणेशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्व. नमिता नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले आणि जलतरण स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटनानंतर विविध वयोगटांतील जलतरणपटूंनी फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या प्रकारांतील स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.यावेळी बोलताना वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत जलतरणपटूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील स्पर्धात्मक वृत्ती वाढविणे आणि रायगडमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. अलिबागमध्ये आधुनिक क्रीडा सुविधा उभारल्या असून भविष्यातही जलतरणासह विविध क्रीडा प्रकारांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. अशा स्पर्धांमधून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना मोठ्या स्पर्धांसाठी तयारी करण्याची संधी मिळते.
माजी नगरसेवक प्रदीप नाईक यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले. जिंकणे किंवा हरणे हे प्रत्येक स्पर्धेचा भाग असते. मात्र, क्रीडाभावना जपत सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करणे हेच खरे यश आहे. अशा दर्जेदार स्पर्धांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते आणि पुरस्कारांबरोबरच आत्मविश्वासाचीही मोठी कमाई होते, असे सांगत त्यांनी सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या शेकडो जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून दिवसभर विविध गटांतील स्पर्धा रंगल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अलिबागमध्ये जलतरण संस्कृतीला चालना देणारी आणि नवोदित खेळाडूंना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.







