। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका डॉक्टरांची तब्बल पाच लाख 99 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिरवाडी येथील डॉ. उमेश शंकर पारेख (62) यांना 26 ऑक्टोबर रोजी एसटी ई-तिकीट बुकिंगच्या नावाने मोबाईलवर एक मेसेज आला. त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र परिवहनचे बनावट ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड झाले. या ॲपच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलवर ओटीपी येऊ लागले. त्यानंतर काही दिवसांनी मोबाईलवर आलेल्या बँकेच्या फोन कॉलद्वारे त्यांना खात्यात अनधिकृत व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही वेळातच त्यांच्या संमतीशिवाय बिरवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील खात्यातून पाच लाख 99 हजार रुपये 36 पैसे इतकी रक्कम अनधिकृतरीत्या काढण्यात आली. आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, मोबाईलमध्ये अनोळखी ॲप डाउनलोड करू नका आणि बँकेशी संबंधित ओटीपी किंवा गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे .






