हल्लेखोर फरार
। चणेरा । प्रतिनिधी ।
चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या दोन अज्ञातांनी 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रोहा शहरातील अष्टमी परिसरात घडली. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे रोहा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सरजील फरीद नवरंगे (रा. अष्टमी, खालचा मोहल्ला, ता. रोहा) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री सरजील हा अष्टमी नाक्यावरील एका हातगाडीवर नाश्ता करण्यासाठी गेला होता. यावेळी दोन अनोळखी तरुण आपला पाठलाग करत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे तो अष्टमी येथील पेट्रोल पंपाच्या दिशेने जात रेल्वे स्टेशन परिसरातील दर्गा रस्त्यावर पोहोचला. या परिसरात अंधार आणि निर्मनुष्यपणाचा फायदा घेत मास्कधारी हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने मानेवर व डोक्यावर वार केले. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
या हल्ल्यात सरजील गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम खासगी रुग्णालयात, त्यानंतर रोहा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने आणि जखमा गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, हल्ल्यामागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चौकशीदरम्यान सरजीलने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी त्याने आपल्या मोहल्ल्यातील नात्यातील एका तरुणाच्या भाच्याला मारहाण केली होती. त्यावेळी संबंधित तरुणाने ‘मी किंवा अन्य कोणामार्फत तुला मारहाण करीन,’ अशी धमकी दिली होती. याच जुन्या वादातून आणि मनात धरलेल्या रागातून आपल्यावर हल्ला झाल्याचा संशय सरजीलने पोलिसांकडे व्यक्त केला आहे.
मास्कधारी हल्लेखोरांनी भरवस्तीजवळील परिसरात विद्यार्थ्यावर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.






