वाढीव गाड्यांमुळे वेळापत्रक कोलमडले; परतीच्या प्रवासात कोकणवासियांचे हाल
| रोहा | प्रतिनिधी |
गणेशाचे विसर्जन करुन परतीच्या प्रवासाला निघालेल्या गणेशभक्तांना कोकण रेल्वेने विलंबाचा झटका पुन्हा दिला आहे. कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या उशिराने धावत असल्याने या वाढीव गाड्यांमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा मोठा फटका गणेशभक्तांना बसला आहे. गणरायाच्या स्वागतासाठी कोकणची वाट धरणाऱ्या गणेशभक्तांना यंदा रेल्वे प्रशासनानेच विलंबाचा प्रसाद दिल्याचे चित्र समोर असताना आता परतीच्या प्रवासात ही कोकण रेल्वे मार्गावर उशिराने धावत आहेत. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडून प्रवाशांची सोय केल्याचा गाजावाजा केला जात असतानाच प्रत्यक्षात मात्र गाड्या वेळेवर चालविण्याची साधी व्यवस्थाही रेल्वेला सांभाळता आलेली नाही, असेच चित्र आहे. स्पेशल 11 ते 12 तास विलंबाने धावत असल्याने गणेशभक्तांचा प्रवास अक्षरशः रखडला आहे.
गणेशोत्सवासाठी लाखो गणेशभक्त कोकणाकडे रवाना होत असताना रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले. मात्र, गाड्या वाढल्या पण नियोजन गायब झाले, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे. दोन गाड्यांच्या प्रचंड विलंबाचा फटका इतर सुमारे 20 गाड्यांनाही बसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. गणरायाच्या दर्शनासाठी घर गाठण्याची घाई, सोबत कुटुंबीय आणि सामानाचा पसारा; मात्र स्थानकावर गाडीची प्रतीक्षा संपण्याचे नाव नाही, अशी अवस्था प्रवाशांची गावाकडे येते वेळी झाली होती. मात्र परतिच्या प्रवासात ही तासन्तास स्थानकावर बसूनही गाडीचा ठावठिकाणा नसल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावरचा प्रवाशांचा विश्वासच डळमळीत झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भाविकांचे मोठे हाल झाले. अनेकांच्या पुढील प्रवासाचे नियोजन कोलमडले, तर वेळेचे गणित पूर्णपणे बिघडले. प्रवाशांची गर्दी वाढणार हे रेल्वे प्रशासनाला आधीपासून माहीत असताना वेळापत्रकाचे नियोजन का कोलमडले, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष गाड्या सोडणे हा केवळ दिखावा ठरणार असेल आणि त्या तासन्तास उशिरानेच धावणार असतील, तर या विशेष व्यवस्थेचा उपयोग तरी काय? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी भावनेचा विषय आहे.
मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमध्ये राहणारे गणेशभक्त गणरायाच्या आगमनासाठी आतुरतेने गावाची वाट धरतात व पुन्हा परतत असतात. अशा वेळी त्यांच्या प्रवासाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेनेच त्यांना ताटकळत ठेवणे, हा केवळ विलंब नसून नियोजनातील गंभीर हलगर्जीपणाचा नमुना असल्याची भावना व्यक्त होत आहे. गाड्या खोळंबतात, प्रवासी ताटकळतात आणि प्रशासनाकडून विलंबाची कारणे सांगितली जातात; मात्र प्रवाशांच्या वेळेचे आणि त्रासाचे काय? हा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
गणेशोत्सवाच्या गर्दीची पूर्वकल्पना असूनही जर रेल्वेचे नियोजन असे कोलमडत असेल, तर भविष्यातील गर्दी व्यवस्थापनाबाबत रेल्वे प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गणरायाच्या विसर्जनानंतर निघालेल्या गणेशभक्त वेळेवर पोहोचविण्याऐवजी रेल्वेनेच त्यांची परीक्षा घेऊ नये. विशेष गाड्यांच्या नावाखाली विशेष विलंब देण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने नियोजन, वेळेचे पालन आणि प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य द्यावे, हीच आता प्रवाशांची मागणी आहे.
सर्व गाड्या वेळेत धावण्यासाठी व गणेशभक्तांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रास बद्दल प्रशासन दिलगिरी व्यक्त करीत असून अतिरिक्त गाड्यांमुळे होणारा त्रास लवकरच कमी होईल.
कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी






