800 किलो मांस, दोन रिक्षा व शस्त्रे जप्त
। पनवेल । प्रतिनिधी ।
नांदगाव येथील सिडको मैदान परिसरात गोवंशाची कत्तल करून मांसाची विक्री करण्याच्या आरोपावरून पनवेल शहर पोलिसांनी इम्रान हनिफ पटेल (32) आणि सर्फराज मैनुद्दीन पटेल ऊर्फ हाग्या (41) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 800 किलो गोमांस, दोन ऑटोरिक्षा, दोन चाकू आणि एक कुऱ्हाड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नांदगाव येथील सिडको मैदान परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात गोवंश मांस विक्रीच्या उद्देशाने कत्तल केल्याचा आरोप आहे. घटनास्थळी तीन जिवंत गोवंशीय जनावरेही आढळून आली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनतर वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अभिजित अभंग, पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोहवा अमोल पाटील, योगेश दिवेकर, अविनाश गंथडे, पोना मिथुन भोसले, सोमनाथ म्हात्रे, शशिकांत काकडे आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अंदाजे 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे 800 किलो मांस, प्रत्येकी सुमारे 50 हजार रुपये किमतीच्या दोन ऑटोरिक्षा तसेच कत्तलीसाठी वापरल्याचा संशय असलेली हत्यारे हस्तगत केली आहेत.
या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे. मांस कोठून आणण्यात आले, त्याचा पुरवठा कोणाकडून झाला, विक्री कोणाला करण्यात आली तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली वाहने व इतर साधनसामग्री याबाबत तपास सुरू आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मांसाच्या खरेदी-विक्रीचे जाळे कार्यरत आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. फरार संशयितांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातील वाहन जप्त करणेही तपासाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.



