वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील केंद्रस्थानी असलेल्या कोलाड-रोहा मार्गावरील आंबेवाडी नाक्यावरील द. ग. तटकरे चौकासमोर मुख्य रहदारीच्या ठिकाणी गेली चार ते पाच महिन्यांपासून रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. या धोकादायक खड्ड्यातून प्रवास करतांना वाहन चालकांसहित प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर हा खड्डा भरला जाईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
कोलाड-रोहा मार्गावरील मुख्य रहदारीच्या ठिकाणी अनेक दिवसापासून रस्ता उखडला आहे. या मार्गांवरून वाहन चालवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे या ठिकाणी वाहने धिम्या गतीने चालवावी लागत असल्याने येथे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. मुरुड ते कोलाड ताम्हाणीमार्गी पुणे या महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे झाले असले तरी कोलाड-रोहा मार्गावरील द.ग. तटकरे चौकासमोरील 200 मिटरच्या रस्त्याचे काम सिमेंट काँक्रिटीकरणने केले नाही. याविषयी अनेकवेळा वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित झाल्यानंतर हा खड्डा मातीने भरण्यात आला. परंतु हा खड्डा भरता भरेना! याचा नाहक त्रास वाहन चालकांसहित प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे. यामुळे हा 200 मिटरचा रस्ता सिमेंट काँक्रेटने करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी एक स्कुटीस्वार या खड्डयातून प्रवास करीत असतांना स्कुटी स्लिप होऊन खाली पडला होता. यामुळे स्कुटीस्वराच्या हाताला गंभीर जखम झाली. दैव बलवान म्हणून तो थोडक्यात बचावला. तसेच या मार्गांवर वाहनांची सतत वर्दळ सुरु असुन वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोलाड वाहतूक पोलीस येथे उभे असतात. परंतु रस्त्याला पडलेला खड्डा चुकवण्याच्या नादात वाहन हे उभ्या असलेल्या पोलिसांच्या अंगावर जाऊ शकतो हे नाकारता येत नाही.
या मार्गावरून धाटाव एमआयडीसी, रोहा, मुरुड, अलिबाग, मुंबई, गोवा, पुणे आदी ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात वर्दल सुरु असते. तसेच कोलाड नाका हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असून येथे वाडया, वस्त्या धरून एकूण 70 ते 72 खेडेगावातील नागरिक बाजारासाठी ये-जा करीत असतात. तसेच, शाळा कॉलेजला जाणारे असंख्य विद्यार्थी याच मार्गावरून प्रवास करीत असतात. यामुळे या ठिकाणी उखडलेल्या रस्त्यामुळे याचा नाहक त्रास वाहन चालकांसहित असंख्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.





