| खोपोली | प्रतिनिधी |
राज्यात सध्या भोंदू कॅप्टन अशोक खरातने भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपांमुळे आधीच भोंदूबाबांबाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाड असतानाच रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आणखी एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जादूटोणा व अंधश्रद्धेच्या नावाखाली एका विवाहित महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ (मुंबई) येथील एका विवाहित महिलेला तिच्या पतीच्या प्रेयसीमुळे वैवाहिक वाद निर्माण झाला होता. या समस्येवर उपाय मिळावा या हेतूने ती आपल्या वडिलांच्या ओळखीतील अब्दुल रशीद उर्फ बाबाजान (रा. कळंबोली, नवी मुंबई) या स्वतःला जादूटोणा करणारा सांगणाऱ्या भोंदूबाबाकडे गेली.
या भोंदूबाबाने “उपाय करून देतो” असे सांगून प्रथम महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला माहेरी बोलावून घेऊन पुढे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथे एका ठिकाणी नेण्यात आले. तिथे मध्यरात्री जादूटोण्याच्या नावाखाली विविध विधी करण्याचा बहाणा करत घराबाहेर काही वस्तू पुरण्यात आल्या. यानंतर अत्यंत विकृत प्रकार करत महिलेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकारामुळे संबंधित महिला मानसिक धक्क्यात गेली. उपचाराच्या नावाखाली फसवणूक आणि अत्याचार झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या सूचनेनुसार खालापूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने कारवाई करत कळंबोली येथून आरोपी भोंदूबाबाला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात एकामागून एक अशा भोंदूबाबांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे. अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या नावाखाली महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.







