खोपोलीत शेकापची ‌‘एकला चलो’ची भूमिका

| खोपोली | प्रतिनिधी |

नगरपालिकांच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांनी एकत्रित परिवर्तन विकास आघाडी करून घवघवीत यश मिळाले होते. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापने परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर पडत ‌‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, शेकापने 2 जिल्हा परिषद गट आणि 5 पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने परिवर्तन विकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापच्या पाठिंब्यामुळे परिवर्तन विकास आघाडीला बळ मिळाल्यामुळे घवघवीत यश मिळाले होते. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शेकपला ठाकरे गट आणि अजित पवार गटाने विचारात न घेता सन्मानजनक जागा न दिल्यामुळे शेकाप परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर पडला आहे. शेकापने खानाव आत्करगांव जि.प. गटातून मिता संतोष पाटील, खानाव पंचायत समिती गणातून शांताराम पाटील, सावरोली जि.प. गटातून जयवंत पाटील, वडगांव पं.स. गणातून चंद्रकांत पाटील, चौक जि.प. आणि पं.स. गणातून करूणा होला यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावेळी कर्जत खालापूर विधानसभा चिटणीस संतोष जंगम, महिला जिल्हा चिटणीस शिवानी जंगम, तालुका चिटणीस किशोर पाटील, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस भूषण कडव, शेकाप युवा खालापूर तालुका उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, धनंजय देशमुख, द्वारकानाथ गावडे, किसन विचारे, सुरेश गावडे, हेमंत होल्ला, समीर मोरे व रमेश दळवी यांच्यासह शेकापक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलोची भूमिका घेतली असून, यापुढे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. तसेच, निवडणुकीत शेकाप मोठा विजय संपादन करतील, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाच्या महिला जिल्हा चिटणीस शिवानी जंगम यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version