गावठी बंदुकीचे रॅकेट उद्ध्वस्त

रत्नागिरी

। दापोली। प्रतिनिधी ।

दापोली तालुक्यातील साकुर्डे शिकार प्रकरणात विनोद बैकर यांच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या बेकायदेशीर गावठी बंदुकीच्या तपास करीत असताना, गावठी बंदुकीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे़  त्याची पाळेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत.

तालुक्यातील वेगवेगळ्या गावांत छापे टाकून दापोली पोलिसांनी सोळा बंदुका जप्त केल्या आहेत़  या प्रकरणात दापोली तालुक्यातील दहा जणांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथील नानू पेंडुरकर यांना अटक केली आहे़

दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली़ गैरकायदा विनापरवाना बंदूक बाळगणार्‍या अमित रहाटे (बोंडआळी), सौरभ मस्कर (मौजे दापोली), अभिषेक जाधव (जालगाव), सौरभ गवळी (जळगाव), विजय आंबेड (मौजे दापोली), नरेश साळवी (करंजाळी), विश्‍वास कांसे (मौजे दापोली), निलेश कातरकर (खेर्डी), प्रशांत पवार (माते गुजर), अनंत मोहिते (कोळबांद्रे) यांना विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता सर्वांना जामिनावर सोडण्यात आले आहे़

अमित रहाटे (रा़  शिवाजीनगर, भोंगळी) यांच्याकडून सिंगल नाडीच्या सोळा बंदुका विनापरवाना नानू पेंडुरकर (रा़ पेनुर, ता़ कुडाळ) यांनी खरेदी केली होती़  त्यानंतर त्याने अनेकांना या बंदुका वाटल्या होत्या़  पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना एकमेकांच्या संगनमताने व सहाय्याने बंदुका या गैरकायदा असल्याचे माहीत असताना आपल्या जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले आहे, तसेच या संशयित आरोपींकडून सोळा गावठी बंदुका जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नानू तेंडुलकर याला दापोली पोलिसांनी अटक केली आहे.

Exit mobile version