पाच जण बेपत्ता, तिघांना वाचविण्यात यश
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पर्यटनासाठी आलेल्या ग्रुपमधील आठ पर्यटक समुद्राच्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले. मात्र पाच जण अद्याप बेपत्ता असून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरु आहे. ही घटना शनिवारी (दि.20) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरासोबतच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून मित्रांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सुटीचा आनंद घेण्यासाठी हे सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यातील आठ जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पोहोण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आठ जण प्रवाहामध्ये वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षकांनी आणि नागरिकांनी घेत बचावकार्य सुरु केले असता बुडालेल्यांपैकी तीन जणांना वाचविण्यात आले. मात्र समुद्रातील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि वाढत्या लाटांमुळे पाच जण वाहून गेले.
आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने, यश कांबळे अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता असलेल्या या पाचही तरुणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक तसेच प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र समुद्रातील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि वाढत्या लाटांमुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. या घटनेमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.







