गंधार फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
तळोजा परिसरातील खैरणे शाळेमध्ये गंधार फाऊंडेशनच्या वतीने 400 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. गंधार ग्रुपचे चेअरमन रमेश पारेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.
गंधार कंपनी व गंधार फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत सीएसआर निधीतून हा उपक्रम राबविला. शाळेत झालेल्या कार्यक्रमात कंपनीचे व्यवस्थापक सुनील पालवे, एचआर हेड केसर सोनावणे, दीपक मेवाडा, सत्यशील माने, संभाजी घाडगे आणि विकास पांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
यावेळी कंपनीचे संचालक आश्लेष पारेख आणि समीर पारेख यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच व्यवस्थापक सुनील पालवे, एचआर हेड केसर सोनावणे आणि सरपंच शैलेश माळी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास खैरणे शाळेचे मुख्याध्यापक राजेश वर्तक, सरपंच शैलेश माळी, बाळाराम पाटील, म्हात्रे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गंधार फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







