कर्जतमध्ये कडक पोलीस बंदोबस्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात घरगुती गॅस वितरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घरगुती गॅस घरपोच करण्याची कार्यपद्धती सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅसधारक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कर्जत आणि नेरळमध्ये बुकिंग केल्यानंतर गॅस उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, गॅस गोडावून आणि कार्यालयाजवळ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जेणेकरून कोणताही गैरप्रकार घडणार नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा अनियमित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्जत आणि नेरळमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांकडून मोठी गर्दी पहायला मिळत आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी सेवा केंद्रावर रांगा लावल्या आहेत. त्यात ऑनलाईन पद्धतीने घरगुती गॅस बुकिंग करण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच, 25 दिवसांनी सिलिंडर देण्याचा निर्णय शासन स्तरावर झाल्याने कर्जत आणि नेरळ येथे घरगुती गॅस सिलिंडर संपला आहे, अशा ग्राहकांसाठी नवीन मोबाईल नंबर देण्यात आला आहे. त्या नंबरवर घरगुती गॅस बुकिंग करण्याची मुभा आहे. तेथे नोंदणी झाल्यानंतर अवघ्या एक-दोन तासांत घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. कर्जत येथे असलेल्या गॅस एजन्सीकडे 1200 गॅस टाक्यांची वाहतूक होत असते. तर, नेरळ येथे 600 टाक्या येत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत दोन्ही ठिकाणी गॅस टाक्यांची वाहतूक अर्ध्यावर आली आहे. त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाल्याने ग्राहक सेवा केंद्राच्या कार्यालयावर गर्दी करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन कर्जत पोलीस ठाण्याने कर्जत येथील गॅस कार्यालयाच्या बाहेर तसेच गॅस टाक्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊन बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, लहान गॅस सिलिंडर विक्री होत असलेल्या ठिकाणी देखील पोलिसांनी जाऊन पाहणी केली आहे. त्या ठिकाणी अवैध रीतीने आणि आगाऊ पैसे घेऊन विक्री तर होत नाही, याची खात्री देखील पोलिसांनी केली आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्राहकांची फसवणूक तर होत नाही, यासाठी समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारे चुकीचे संदेश पाठवू नये, अशी सूचना नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी केले आहे.







