| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने रायगड जिल्ह्यात गेल्या महिन्यात वरिष्ठ गटातील निवड चाचणी स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघातील दोन प्रतिभावान जगदगती गोलंदाज अभिषेक खातू आणि कौस्तुभ म्हात्रे यांनी केलेल्या सुरेख खेळाच्या आधारावर त्यांची निवड पुढील होणाऱ्या सुपर लीगच्या सामन्यांसाठी करण्यात आली आहे.अभिषेक खातू यांची निवड सेक्रेटरी 11 संघात तर कौस्तुभ म्हात्रे यांची अध्यक्षीय 11 संघात करण्यात आली आहे.अभिषेक खातू यांनी साखळी फेरीतील पाच सामन्यात एकूण 18 गडी बाद केले, त्यामध्ये त्यांनी एका डावात 8 फलंदाज बाद करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून फलंदाजी करतांना त्यांनी एकूण 161 धावा काढल्या त्यामध्ये दोन डावात त्यांनी 50 पेक्षा जास्ती धावा काढल्या आहेत. कौस्तुभ म्हात्रे यांनी रायगडच्या संघाकडून खेळतांना साखळी फेरीतील सामन्यात एकूण 22 फलंदाजांना बाद केले होते.दोन्ही युवा प्रतिभावान जलदगती गोलंदाजांनी आपल्या खेळाची छाप स्पर्धेतील सामन्यात पडल्यामुळे दोघांची निवड सुपर लीगच्या सामन्यांसाठी करण्यात आली आहे.दोन्ही खेळाडूंना भावी वाटचालीसाठी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांच्या सह सर्व पदाधिकारी,सदस्य व क्रिकेट प्रेमी लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.







