सापे-वामने रेल्वे स्थानकातील अपुऱ्या सुविधांमुळे हाल; रेल्वेच्या दारात लटकून प्रवास
| महाड | प्रतिनिधी |
गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा पनवेल, दिवा, मुंबई व उपनगरांकडे होणारा परतीचा प्रवास अत्यंत जीवघेणा आणि थरारक ठरत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील सापे-वामने रेल्वे स्थानकावर प्रशासनाचे दुर्लक्ष आणि योग्य फलाटाच्या अभावामुळे प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. महाड, पोलादपूर आणि मंडणगड या ग्रामीण भागातील हजारो नागरिक मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी या स्थानकावर मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
सापे-वामने स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारा योग्य उंचीचा प्लॅटफॉर्म अद्यापही उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांना जड सामान आणि पाठीवर मोठ्या बॅग्ज अडकवून जीव मुठीत धरून गाडीत शिरावे लागते. विशेष गाड्या स्थानकावर अवघ्या काही मिनिटांसाठी थांबत असल्यामुळे आणि दरवाज्यांवर प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवाशांना पायदानवर उभे राहून किंवा दारात लटकून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
भौगोलिकदृष्ट्या ग्रामीण भागात असलेल्या या स्थानकावर योग्य फलाट आणि प्रवाशांसाठी शेड नसल्यामुळे उन्हात किंवा पावसात प्रवाशांना तासनतास उघड्यावर उभे राहावे लागले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी शेड उभारण्यात आली आहे, तिथेही पंख्यांची व्यवस्था नसल्यामुळे उकाड्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दुसरीकडे, हजारो प्रवासी ताटकळत असताना स्थानकावरील कॅन्टीन पूर्णपणे बंद असल्यामुळे खाण्यापिण्याविना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. योग्य फलाट नसल्यामुळे यापूर्वीही पाय घसरून खाली पडण्याच्या घटना घडल्या असून, काही लहान मुली व वयोवृद्ध व्यक्ती फलाटावरून निसटल्याच्या भयंकर घटना घडल्या आहेत; परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
सापे-वामने स्थानकाच्या विकासासाठी आणि योग्य फलाट बांधण्यासाठी प्रशासनाकडून एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कागदोपत्री मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी प्रत्यक्षात या विकासकामांना अद्याप कोणतीही गती मिळालेली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी हा जीवघेणा प्रवास तातडीने थांबवून रेल्वे प्रशासनाने सुरक्षित प्रवासाची सोय करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, रेल्वेतील प्रचंड गर्दी आणि अपुऱ्या सुविधांमुळे अनेक प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बससह खाजगी गाड्या पकडून मुंबई गाठण्याचा पर्याय स्वीकारला. तरीसुद्धा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि तरुणांना तासनतास उभे राहून किंवा शौचालयाच्या बाजूला बसून प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सापे-वामने स्थानकावर योग्य फलाट आणि शेड नसल्यामुळे आम्हाला तासन्तास उन्हात आणि पावसात उघड्यावर थांबावे लागते. त्यातच शेडखाली पंखे नसणे, ट्रेनच्या दरवाज्यांवर होणारी गर्दी आणि बंद असलेले कॅन्टीन यामुळे आमचा परतीचा प्रवास अत्यंत जीवघेणा ठरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
हृदय तांबे,
प्रवासी







