सुधागड-पाली तालुक्यात 62 जलकुंड पूर्ण; संरक्षित सिंचनाची सुविधा
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
जिल्हा वार्षिक योजना सन 202526 अंतर्गत सुधागडपाली तालुक्यात मंजूर झालेल्या जलकुंड कामांची पाहणी तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले.
सुधागड तालुक्यात आतापर्यंत 62 जलकुंडांची कामे पूर्ण झाली आहेत. मग्रारोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या फळबाग लागवडीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही जलकुंड उपयुक्त ठरत आहेत. यामुळे पाण्याची उपलब्धता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा, काजू व नारळ या पिकांची लागवड केली जाते. मात्र डिसेंबर ते मे या कालावधीत संरक्षित सिंचनाची सुविधा नसल्यामुळे जिवंत कलमांचे प्रमाण कमी राहते आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
जलकुंडामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण (लाइनिंग) करण्यात येणार असून, एका जलकुंडात सुमारे 52,731 लिटर पाणी साठवले जाणार आहे. 10 ते 25 गुंठे क्षेत्रासाठी एक जलकुंड या प्रमाणे, जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्रासाठी आठ जलकुंडांचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.
संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास फळबागा जिवंत राहण्याचे प्रमाण वाढेल आणि उत्पादनक्षमता सुधारेल. त्यामुळे जलकुंड योजना सर्वसामान्य फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.






