| रसायनी | प्रतिनिधी |
रायगड जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा 2026 ॲमुचर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगड आणि जिल्हास्तरीय तायक्वांदो राष्ट्रवादी चषक मोहोपाडा येथील जनता विद्यालय शाळेचा सभामंडपात मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये अटॅकर्स तायक्वांदो अकॅडमीने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेंत प्रथम क्रमांक अटॅकर्स तायक्वांदो अकॅडमी, द्वितीय क्रमांक गुरुकुल तायक्वांदो अकॅडमी, तृतीय क्रमांक अगस्तू तायक्वांदो अकॅडमी, चतुर्थ क्रमांक किंग फायटर क्लब, पाचवा क्रमांक तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी यांनी पटकावला. या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष संदीप मुंढे, सचिन माळी आणि रोहित सिनलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्याला चालना देणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. संदीप मुंढे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.







