‘अटल सेतू ते गेटवे’ 17 किलोमीटर पोहून ऐतिहासिक विक्रम
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील अवघ्या 8 वर्षांच्या अक्षर दिपाली चेतन पाटील या चिमुकल्याने धाडस, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समुद्रालाही जिंकत अभूतपूर्व कामगिरी नोंदवली आहे. अक्षरने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 17 किलोमीटरचे सागरी अंतर अवघ्या 2 तास 29 मिनिटे 29 सेकंदात पूर्ण करून ऐतिहासिक विक्रम केला आहे.
17 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1.59 वाजता अक्षरने अटल सेतू परिसरातून अरबी समुद्रात झेप घेतली. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील नारायण मयेकर यांच्या देखरेखीखाली हा प्रवास सुरू झाला. समुद्रातील लाटा, वेगवान प्रवाह आणि थंड वातावरण यांचा सामना करत अक्षरने अखेर 4.29 वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावर पोहोचत आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
मूळ केगाव गावचा रहिवासी असलेला अक्षर पाटील हा सध्या उरणमधील सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या वेळी त्याचे कुटुंबीय, ‘सी स्विमिंग टीम’ तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. किनाऱ्यावर पोहोचताच टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत करण्यात आले. अवघ्या आठव्या वर्षी इतके मोठे सागरी अंतर पार करणे ही अत्यंत दुर्मिळ कामगिरी मानली जाते. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेने या विक्रमाची अधिकृत नोंद घेतली असून, अक्षरच्या या यशामुळे उरण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या मोहिमेसाठी पर्यवेक्षक संतोष पाटील व त्यांच्या टीमने मोलाचे सहकार्य केले. स्थानिक नागरिक व मान्यवरांकडून अक्षरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







