जुगार खेळणार्‍यांवर तहसीलदारांची कारवाई

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

 सर्वसाधारणपणे जुगार अड्डा,अवैध धंधे यावर पोलीस प्रशासन कारवाई करते. मात्र पंढरपूर तालुक्यात चक्क तहसीलदार यांनी एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार खेळणार्‍या ठिकाणी धाड टाकली आणि पोलिसांना बोलवून पुढील कारवाई केली. या प्रकरणी 22 जनांवर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची माहिती पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.

सध्या करोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागात गृहअलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांना करोना काळजी केंद्रात उपचारासाठी पाठवीत आहेत. हेच काम करण्यासाठी पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर हे तालुक्याच्या दौर्‍यावर होते. तालुक्यातील चळे आंबे, सरकोली आणि ओझेवाडी या गावांचा दौरा आटोपून ते पंढरपूरकडे निघाले होते त्याच दरम्यान मौजे रांझणी हद्दीतील हॉटेल गारवा या ठिकाणी अनेक मोटर सायकल लावलेल्या दिसून आले. याबाबत ते पाहणी करण्यास त्या ठिकाणी गेले.

हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत लोक पत्ते खेळत असल्याचे दिसून आले. तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांना तेथे बोलावून घेतले. पोलिसांनी पंचनामा करून 22 जणांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाई वेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडलाधिकारी संतोष सुरवसे, तलाठी मुसाक काझी, बी.ए.गुजले व वाहनचालक रमेश जाधव यांनी सहकार्य केले असले तरी अशी कारवाई पोलिसांनी न करता तहसीलदार यांनी केल्याने अनेक उलट सुलट चर्चेंना उधाण  आले आहे.

Exit mobile version