। मुंबई । प्रतिनिधी ।
अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तीन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. राजस्थान पोलीस आणि ‘अँटी-गँगस्टर टास्क फोर्स’ (AGTF) यांनी संयुक्त कारवाई करत सोमवारी (दि.19) राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण महाराष्ट्रातील आहे, तर इतर दोघे हरियाणातील असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मुंबईतील विलेपार्ले परिसरातील ‘पुष्पा नर्सी पार्क’जवळ टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत टायगर श्रॉफ सुदैवाने बचावला, मात्र त्याचा चालक फिरदोश आणि उमेश चव्हाण नावाचा एक पादचारी जखमी झाले. पोलिसांनी चालकाचा जबाब नोंदवून घेतला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी 15 पथके तैनात केली होती. याकरिता कोटा पोलिसांची मदत मुंबई पोलिसांनी घेतली. कोटा रेल्वे स्थानकात सापळा रचून पोलिसांनी तिघांना घेतले. अवघ्या 17 तासातच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून या प्रकरणात त्यांचा नेमका सहभाग किती आहे, याचा तपास करत आहेत.







