| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील चौक वावंढळ गावातील इस्कॉन साईटवर रविवारी (दि.18) जुन्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेत एकावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप असून, त्यांच्या भावालाही हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वावंढळ येथील सर्व्हे क्रमांक 65/1, 65/2, 66/1, 66/2 तसेच इतर सर्व्हे क्रमांकांतील एकूण सुमारे 7.5 एकर क्षेत्राची मिळकत फिर्यादी यांच्या वडिलोपार्जित मालकीची होती. ही मिळकत सुमारे 40 वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. या ठिकाणी इस्कॉन ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर व शाळा बांधण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित जागेवर गवत साफ करण्याचे काम सुरू असताना या ठिकाणी वाद झाला होता.






