‘स्वच्छ, सुंदर पनवेल’च्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
नवीन पनवेल सेक्टर 15 येथून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेले लोखंडी ‘ट्री गार्ड’ सध्या कचरा टाकण्याची जागा बनले आहेत. झाडांचे संरक्षण व्हावे आणि रस्त्याचे सौंदर्य वाढावे, या उद्देशाने बसविण्यात आलेल्या या ट्री गार्डमध्येच नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि अन्य कचरा ट्री गार्डच्या आत साचत आहे. त्यामुळे झाडांभोवती अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून, परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यालगतच कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. झाडांच्या संरक्षणासाठी उभारलेली सुविधा कचरा साठविण्यासाठी वापरली जात असल्याने महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे पनवेल महानगरपालिकेकडून स्वच्छता आणि शहर सुशोभीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी कचरा साचत असल्याने ‘स्वच्छ, सुंदर पनवेल’ ही संकल्पना केवळ कागदावरच आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेने या परिसराची तातडीने स्वच्छता करावी. तसेच ट्री गार्डमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कचरा टाकण्यासाठी योग्य ठिकाणी कचरापेट्या उपलब्ध करून देण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे. झाडे वाचविण्यासाठी उभारलेल्या ट्री गार्डचा उपयोग पुन्हा त्याच उद्देशासाठी व्हावा, यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे.







