। रोहा । प्रतिनिधी ।
डंपिंग ग्राऊंड परिसरात काम करत असताना विजेचा तीव्र शॉक लागून एका सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि सुस्त कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशोक कुशा वाघमारे (42 ) रा. चणेरा असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनस्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण कामगाराची पत्नी रंजना वाघमारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अशोक वाघमारे नियमितप्रमाणे डंपिंग ग्राऊंड परिसरात साफसफाई व मशीनमध्ये कचरा जाळण्याचे काम करत होते. यावेळी मशीनमधील विद्युत प्रवाहाचा त्यांना जोरदार धक्का बसला. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रोह्यातील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सुयश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्निल म्हात्रे व सुनील सपकाळ करीत आहेत. दरम्यान, डंपिंग ग्राऊंड परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही प्रभावी उपाययोजना नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






