प्रेरणादायी पर्वाचा अंत; कोल्हापुरात शोककळा
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (वय 91) यांचे मंगळवारी (दि.4) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबातून प्रवास सुरू करून राज्यपालपदापर्यंत मजल मारलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने एका प्रेरणादायी पर्वाचा अंत झाला.
डी. वाय. पाटील संस्था समूहाचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील (91) यांच्यावर आज, बुधवारी शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी 6.15 वाजता कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर डी. वाय. पाटील संस्था समूहाचे प्रमुख संजय डी. पाटील यांनी डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
गेल्या 10 दिवसांपूर्वी पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. निवासस्थानातच सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शांतादेवी पाटील, डी. वाय. पाटील संस्था समूहाचे प्रमुख संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, मुलगी भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे, सुप्रिया चव्हाण पाटील, मुलगा विजय पाटील, अजिंक्य पाटील (मुंबई) आणि मुली डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. पूजा चोलेरा यांच्यासह मोठा परिवार आहे. डॉ. पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोल्हापूर शहर आणि परिसरातून विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवासस्थानाकडे धाव घेतली. कसबा बावडा ग्रामस्थांनी दुकाने आणि अन्य व्यवहारही बंद ठेवले होते. डी. वाय. पाटील समूहाच्या आठ विद्यापीठे आणि 182 इन्स्टिट्यूटमधील कामकाज बंद ठेवून पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सहकार आणि राजकारण क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे. बुधवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मोठी गर्दी केली होती. डॉ. पाटील यांचे पार्थिव कसबा बावडा येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. आज सकाळपासून अंत्यदर्शन घेण्यासाठी सामान्य नागरिकांपासून मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी डॉ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या व्यापक सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याला आदरांजली वाहिली. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा विस्तार पोहोचवणारे डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात आणि देशाबाहेरही उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचला. त्यांच्या जाण्याने राज्याने एक दूरगामी विचार करणारा मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अंत्यदर्शन घेणाऱ्यांमध्ये खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, निवृत्त न्या. बी. जी.कोळसे पाटील, विधान परिषद माजी विरोधीपक्ष नेते आमदार अंबादास दानवे, तसेच अमित देशमुख, विश्वजीत कदम, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, शिवाजी पाटील, अशोक माने, हेमंत ओगले, यशोमती ठाकूर,आदी आमदार, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, कर्नाटकचे माजी मंत्री आर.एम. पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, राजेश कदम, लक्ष्मणराव चिंगळे, महापौर रूपाराणी निकम,कुलगुरू डॉ. रजनीश कामत, अभिनेते सयाजी शिंदे, भरत जाधव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुरुदीप सफल, प्रणव झा, बी एन संदीप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, आमदार विजय वडेट्टीवार, सचिन सावंत, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील आदींचा समावेश होता.
यशवंत निवास येथे अंतिम दर्शन
डॉ. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कसबा बावडा, कोल्हापूर येथील यशवंत निवासफ येथे ठेवण्यात आले होते. यावेळी कोल्हापूरकर तसेच डॉ. पाटील यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती आणि नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.





